रामटेक :- रामटेक तालुक्यातील बोरी (घोटी टोक) येथील इंदिरा गांधी मुलांचे वसतिगृहातील 4 विद्यार्थी पेंच प्रकल्पाच्या कांद्री शाखा कालव्यात सोमवारी दुपारी वाहून गेले होते. अंधार झाल्याने सोमवारी सायंकाळनंतर शोधमोहीम थांबवावी लागली होती. मंगळवारी सकाळपासूनच शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. एकाचा मृतदेह घटनास्थळापासून 1 किमी अंतरावरील लोहारा येथे दोघांचे मृतदेह 4 किमी अंतरावर सालईमेढा, तर एक मृतदेह तब्बल 5 किमी अंतरावरील शिवानी भोंडकी शिवारात कालव्यात सापडले. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले. मनदीप अविनाश पाटील , अनंत सांबारे, मयंक मेश्राम , मयूर बांगरे सर्व राहणार नागपूर अशी मृतांची नावे आहेत. ते बोरी (घोटी टोक) येथील इंदिरा गांधी मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास राहून शिक्षण घेत होते. वसतिगृहातील अन्य चार मित्रांसोबत जवळच असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कालव्यात उड्या घेताच वाहून गेले होते. 4 विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच वसतिगृहाचे अधीक्षक धनराज महादुले, शिपाई प्रशांत पाटील व चौकीदार कैलास वाढवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या वसतिगृहाला समाजकल्याण विभागाची मान्यता होती. येथील 4 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर कुंभकर्णी निद्रेत असणारा समाजकल्याण विभाग खडबडून जागा झाला. मंगळवारी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी घटनास्थळ व वसतिगृहाला भेट दिली. तेथील सोयी-सुविधांची सुविधांचा अभाव दिसून आला. यासोबतच अनेक पाहणी केली. यावेळी वसतिगृहात सोयी अनियमितता आढळून आल्याने या वसतिगृहाची मान्यता तात्काळ रद्द करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार वसतिगृहाची मान्यताच रद होणे निश्चित मानले जात आहे. घटनेनंतर कारवाई करणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी तपासणी केली होती का, केली असेल तर इथे विद्यार्थी कसे राहतात. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाहीत हे त्यांच्या निदर्शनास आले नाही काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील अधिक तपास करीत आहेत.
- ब्युरो रिपोर्ट राकेश मर्जीवे, रामटेक नागपूर