- जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान
- जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र
- राज्य सीमेवर विशेष दक्षता
- समाज माध्यमांवर राहणार विशेष लक्ष
नागपुर :- जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाचे ७५ टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नाही. यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. इटनकर यांनी यावेळी केले.
सहाय्यक पोलिस आयुक्त निसार तांबोळी यांनी शहरी भागात तर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामीण भागात पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदी विषयांची माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागामार्फत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही बातमी पण वाचा : शरद पवार बताएं मविआ का मुख्यमंत्री कौन होगा : देवेंद्र फडणवीस