Home » शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने लाखोंचे नुकसान

शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने लाखोंचे नुकसान

बाजार समिती न्याय मिळवून देणार काय ? 

by Maha News 7
0 comment

यवतमाळ :-  यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनची काढणी मोठ्या प्रमाणात झाली असून, शेतकरी त्याची विक्री करण्यासाठी बाजार समितीत येत आहे. शुक्रवारीदेखील अनेक शेतकरी येथील बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आले होते. दरम्यान याचवेळी पावसाने झोडपले. व्यापाऱ्यांचे सोयाबीन शेडमध्ये तर शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसात होते. त्यामुळे शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांना पदोपदी पांगविण्याचे  काम केले जात आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी गत काही दिवसांपासून सुरू झाली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे काढणी झालेल्या सोयाबीनची शेतकरी विक्री करीत आहे. शासनाने सोयाबीनला अंदाजे चार हजार ८०० रुपये हमीदर जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मात्र सोयाबीनची तीन हजार ८०० ते चार हजार रुपये दरानेच खरेदी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. शेतकरी आर्थिक अडचण दुर करण्यासाठी भाव नसतानाही सोयाबीनची विक्री करत आहे. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे भाव पाडल्याचे आरोप होत आहे. दरम्यान शुक्रवारी येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. शेडमध्ये आधीच व्यापाऱ्यांनी आपला माल भरून ठेवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन बाहेरच ठेवावे लागले. दरम्यान याचवेळी पावसाने कहर केला. यात शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. बाजार समितीत नेहमीच व्यापारी शेडवर ताबा करून शेतकऱ्यांना माल बाहेर ठेवण्यास भाग पाडत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसात भिजल्याने त्याची विक्री कुठे करावी व भाव किती मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • यवतमाळ शहर, प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ

You may also like