रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चिचाळा येथे व देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील मुकणापूर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कालव्यात व तलावत बुडून दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाचा मृतदेह 5 तासानंतर तर एकाचा मृतदेह 22 तासानंतर प्राप्त झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चिचाळा येथील रहिवासी लक्ष्मण मंगल सव्वालाखे वय 42 वर्षे हे सोमवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास बकऱ्यांसाठी चारा आणायला चिचाळा नगरधन मार्गावर गेले होते. चारा कापायला झाडावर चढले असता अचानक त्यांचा तोल गेला आणि खाली असलेल्या कालव्यात जाऊन पडले. कालव्याला जास्त पाणी असल्याने काही किलोमीटर पर्यंत ते वाहत गेले. सायंकाळ होऊनही परत न आल्याने कुटुंबियांने शोधमोहीम सुरू केली असता चिचाळा नगरधन मार्गावर असलेल्या कालव्याच्या कडेला त्यांची सायकल आणि चप्पल दिसून आली. शोधाशोध केली असता लक्ष्मण मृत अवस्थेत एक ते दीड किलोमीटर अंतरावर आढळून आले. या संपूर्ण घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले असून अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे.
तर देवलापार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मुकणापूर गावातील रहिवासी श्रीराम बावणे वय 60 वर्ष. हे आपल्या दोन मित्रासह बकऱ्या चारायला जंगल परिसरात गेले असता सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वाघाने डरकाळी दिली असता वाघाच्या डरकाळीने संपूर्ण बकऱ्या अस्तव्यस्त झाल्यात. तिघांनीही आपापल्या बकऱ्या एकत्रित करून घरी आणले. मात्र श्रीराम बावणे यांचा एक बकरा तलावाच्या पलीकडे राहून गेला होता. म्हणून पुन्हा आपल्या 2 मित्रासह बकरा आणायला गेले. मात्र त्यांनी यावेळी रस्त्याचा मार्ग ण स्वीकारता श्रीराम यांनी स्वतःच्या अंगातील सर्व कपडे काढून तलावात उतरून पलीकडे बकरा आणायला गेला. मात्र काही अंतर समोर जाताच तो बुडू लागला. सोबत असलेल्या दोन्ही मित्रांनी आरडाओरडा केला आणि घटनेची माहिती कुटुंबियांना व देवलापार पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले व स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोध सुरु केले. मात्र अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. विशेष म्हणजे घटनेची माहिती SDRF, NDRF टीमला देऊनही 22 तास होऊनही टीम पोहचू शकली नव्हती. गावातल्या गोताखोरांच्या मदतीने 4.30 वाजताच्या सुमारास मृतदेह शोधण्यास पोलिसांना यश आले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले असून अधिक तपास देवलापार पोलीस करीत आहेत.
- पंकज चौधरी, रामटेक नागपूर