रामटेक :- रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांची बंडखोरी सर्वात मोठी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वारंवार विनंती करूनही मतदारसंघ काँग्रेसला न सोडल्याने आता त्यांचे उमेदवार विशाल बरबटे अडचणीत आले आहेत. मुळकांमुळे येथील लढत प्रतिष्ठेची आणि महायुतीतील शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्यासाठीही मोठी अडचणीची दिसत आहे. कॉंग्रेसचे दुसरे बंडखोर चंद्रपाल चौकसे, सचिन किरपानही रिंगणात आहेत. शिवाय, भाजपमधून निलंबित माजी आमदार मल्लीकार्जून रेड्डी यांची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर विधानसभेचे रणांगण स्पष्ट झाले. यात भाजपला अंशतः दिलासा मिळाला असला तरी धाकधूक कायम आहे. तर, काँग्रेसपुढे काही मतदारसंघ वगळता संकट कायम आहे. भाजपला प्रमुख ‘बंडोबांना थंड करण्यात यश आले.
तर, काँग्रेसला मोठे मतविभाजन होईल असे बंडखोर बसविण्यात अपयश आले. त्यामुळे आता प्रचारात पुढे जाऊन मैदान मारण्याची कसोटी दोन्ही पक्षांपुढे आहे. रामटेकात बहुरंगी लढत होईल अशी जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष असेल. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या पाठीशी काँगेसजण असून, माजी मंत्री सुनील केदार यांचीही येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रामटेकमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार आशिष जयस्वाल, काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक व शिवसेना ठाकरे गटाचे विशाल बरबटे , चंद्रपाल चौकसे अशी बहुरंगी लढत होऊ शकते.
- ब्युरो रिपोर्ट राकेश मर्जीवे रामटेक नागपूर