हिंगोली :- राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून रामराव वडकुते (Ram Rao Vadkute) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु यापूर्वी आपण महामंडळावर काम केलेले आहे त्यामुळे पक्षाने मला विधानसभा किंवा विधान परिषदेवर संधी द्यावी असा व्हिडिओ रामराव वडकुते यांनी समाज माध्यमांवर प्रसारित करीत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशाने भाजपा नेते माजी आमदार रामराव वडकुते यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. रामराव वडकुते हे यापूर्वी दहा वर्ष याच महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील त्यांनी कार्यकाळ गाजवलेला आहे.
महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची असलेली लक्षणीय संख्या लक्षात घेता पक्षाने आपल्याला विधानसभा किंवा विधान परिषदेवर संधी द्यावी. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपल्याला संधी मिळेल असे वाटत होते परंतु ते झाले नाही. महामंडळावर आपण काम करण्यास इच्छुक नाहीत माझ्या ऐवजी इतर कार्यकर्त्याला ही संधी द्यावी व मला समाजाचे नेतृत्व म्हणून विधिमंडळात काम करण्याची संधी द्यावी अशा आशयाचा व्हिडिओ वडकुते यांनी समाज माध्यमांवर टाकल्यामुळे त्यांची पक्षाबाबतची नाराजी दिसून येत आहे. रामराव वडकुते यांचा राजकीय अनुभव पाहता पक्षाने त्यांना मोठी संधी देणे अपेक्षित होते. परंतु महामंडळावरील निवड ही त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीची ठरली आहे. याबाबतीत पक्ष आता काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- प्रतिनिधी, गोपाल सातपुते हिंगोली
ही बातमी पण वाचा : वर्धा विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच