Home » दगडाने ठेचून पानठेला चालकाची निर्घृण हत्या

दगडाने ठेचून पानठेला चालकाची निर्घृण हत्या

मंगळवारपासून होता बेपत्ता,निर्जनस्थली आढळला मृतदेह

by Maha News 7
0 comment
Wadi Murder

नागपूर :- एका पानठेला चालकाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. सुभाष गुलाब बोरकर (55) रा. दुर्गधामना, दवलामेटी असे मृताचे नाव आहे. मंगळवार रात्रीपासून सुभाष बेपत्ता होते. कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची सूचनाही पोलिसांना दिली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह एका गोदामात आढळून आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष यांचा खडगाव मार्गावर पानठेला आहे. पानठेल्याच्या आड ते अवैधरित्या दारूही विकत होते. दिव्यांग असल्याने मुलेच त्यांना पानठेल्यावर सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी जात होते. मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मुलाने सुभाष यांना पानठेल्यावर सोडले. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका मजुराने सुभाष यांना उधारीचे 700 रुपयेही दिले. रात्री 9 वाजताच्या सुमारास सुभाष यांनी पानठेला बंद केला. रात्री 10 वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी सुभाष यांना फोन केला, मात्र संपर्क झाला नाही. खडगावपासून दवलामेटीपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र सुभाष मिळाले नाही. मध्यरात्रीला कुटुंबीयांनी वाडी ठाण्यात ते बेपत्ता असल्याची सूचना दिली. बुधवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ते खडगाव मार्गावरील सीटीडीसी गोदामाजवळ मृतावस्थेत आढळले.

त्यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आला होता आणि आस-पास रक्त सांडलेले होते. घटनेची माहिती मिळताच डीसीपी लोहित मतानी आणि वाडीचे ठाणेदार राजेश तटकरे पथकासह घटनास्थळी पोहोचले. सुभाष बेपत्ता असल्याची तक्रार आधीच पोलिसांत होती. त्यामुळे तत्काळ त्यांची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. सुभाष यांना तीन मुले आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून पानठेल्याच्या आड दारूची अवैध विक्री करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दारूच्या वादातूनच कोणीतरी त्यांचा खून केल्याचा संशय आहे. पोलिस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासत आहेत.

ही बातमी पण वाचा : श्याम मानव के व्याख्यान में भाजपा युवा मोर्चा का हंगामा 

You may also like