रामटेक : रामटेकमध्ये पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी रावण वधाचा अपूर्व सोहळा अनुभवला. गडमंदीरावरून प्रभू श्रीरामांचा विजयी भव असा आशीर्वाद गडावरील रामाच्या शस्त्रसज्ज निशाणांनी जय श्रीरामच्या जयघोषात डीगीच्या मैदानात रावणाचा शिरच्छेद केला. सोबत शुर्पणखेचे नाकही कापले. हा अविस्मरणीय अभूतपूर्व सोहळा बघायला नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वत्र रावणाचे दहन केल्या जाते मात्र अयोध्या व रामटेक येथेच रावणाचा वध केला जातो हे विशेष. रावण वधाचा हा अभूतपूर्व अपूर्व सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. रामटेकचा दसरा उत्सव हा अतिशय प्राचीन आणि लक्षवेधक आहे. यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल , SDO प्रीयेश महाजन ,प्रशासकीय अधिकारी, गडावरील पंडे , पक्षाचे नेते उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरगते , पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडेकोट चोख बंदोबस्त होता,एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देत हा सोहळा मोठ्या हर्षोल्लासात पार पडला. मानापूर- भोजापूर या गावांच्या सीमेवर असलेल्या डीगीच्या मैदानावर मातीचा टोलेजंग रावण तयार करण्यात आला होता. रावणाच्या मागेच रावणाच्या बहिणीचा शुर्पणखेचाही पुतळा तयार करण्यात आला होता.
शेकडो नागरिक गडावर रामाच्या निशाणांची पूजा केलेली व विजयीभवचा आशीर्वाद घेऊन निशाणांनी शस्त्रसज्ज होऊन डिगीच्या मैदानाकडे कूच केले.
याचवेळी शहरातील वस्तादांचे आखाडे देखील शस्त्रांचे प्रात्यक्षिक करीत रामाच्या निशाणांना सामील झाले आणि डीगीच्या मैदानाकडे पोहोचले. जयश्रीरामचा जयघोष करीत निशाणांच्या नेतृत्त्वात आखाडे आणि हजारोंचा सैन्यसागर डीगीच्या मैदानावर रावणावर लोटला. जयश्रीरामच्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला होता.
रामाच्या निशाणांनी रावणाचा शिरच्छेद केला व शुर्पणखेचे नाकही कापले. उर्वरित सेनेने रावणाच्या शरीराची खांडोळी केली व माती लुटून नेली. निशाणधारीची आणि पंड्यांची यावेळी पाद्यपूजा करण्यात आली. आखाड्यांनी प्रात्यक्षिक सादर केली. रावण वधात सहभागी सर्व आखाड्यांनी नेहरू मैदानावर शस्त्रांची प्रात्याक्षिके सादर केली. नगर पालिकेच्या वतीने
वस्तादांचा सत्कार करण्यात आला.