Home » Nagpur : SRMMCON नर्सिंग विद्यार्थ्यांची जर्मनीत भरारी

Nagpur : SRMMCON नर्सिंग विद्यार्थ्यांची जर्मनीत भरारी

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 25 परिचारिका ठरल्या पात्र

by Maha News 7
0 comment
Smt Radhikabai Meghe Memorial College of Nursing

नागपूर : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इंन्स्टिट्यूट अभिमत विदयापीठाशी संलग्न श्रीमती राधीकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिगमधील (SRMMCON)25 विद्यार्थीनी युरोपातल्या जर्मनी सारख्या प्रगत देशामध्ये रुग्ण सेवेची संधी मिळविण्यात यश मिळविले आहे. या परिचारिकांनी वार्षिक 30 लाखांपर्यंतच्या नोकरीची संधी खेचून आणत या यशाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश परिचारिका जर्मनीमधील हॅम्बर्ग येथील UKE रुग्णालयातल्या सेवेत दाखल होणार आहेत. जर्मनीमधील सर्वात जुने आणि उच्च दर्जाचे अद्ययावत सुविधा असलेले रुग्णालय अशी या रुग्णालयाची ओळख आहे.

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इंन्स्टिट्यूट अभिमत विदयापीठाने 26 सप्टेंबरला आयोजित एका खास समारंभात या परिचारिका विद्यार्थ्यीनींना जर्मनीच्या आरोग्य क्षेत्रात त्यांच्या व्यावसायिक करीअरला सुरुवात करण्याची संधी प्रदान केली होती. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना जर्मनीला जाण्यापूर्वी जर्मन भाषा आत्मसात करणे गरजेचे होते. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकता यावी, यासाठी विशेष प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिली. ज्यात या परिचारिका अल्पावधीतच जर्मन भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नेत्रदिपक कामगिरी बजावत नवीन भूमिका स्विकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रमुख सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे विदर्भातील दुर्गम भागातल्या 25 परिचारीकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी रुग्ण सेवेची संधी मिळणार आहे.

यावेळी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इंन्स्टिट्यूट अभिमत विदयापीठाच्या कुलसचिव डॉ. स्वेता काळे पिसुलकर, कार्यकारी संचालक, क्वालिटी ॲश्युरन्स (शैक्षणिक उत्कृष्टता) डॉ. तृप्ती वाघमारे, जर्मन भाषा आणि प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक एनरिको लोब्रिगो उपस्थित होते.परिचारिकांना ही संधी मिळावी यासाठी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इंन्स्टिट्यूट अभिमत विदयापीठा सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशनचे संचालक डॉ. छत्तीज राज, श्रीमती राधीकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिगच्या प्राचार्या डॉ. वैशाली ताकसांडे, शैक्षणिक अधिष्ठाता जया गवई, प्राचार्य श्रीमती डॉ. रंजना शर्मा, श्रीमती इंदू आलवाडकर, श्रीमती ए. शेख, दुरस्त शिक्षण विभागाचे अधिकारी शुभंकर घेवडे यांच्यासह इतर प्राध्यापक, सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली.

 

You may also like